Monday 8 June 2020

निर्माल्य (रूपककथा)

एक सुंदर तरूणी फुलांनी गजबजलेल्या बागेत आली. तिने आपल्या नाजूक कळीसारख्या बोटांनी हळूच एक गुलाबाचे फूल खुडले. फूलपाखराच्या पंखांसारख्या असलेल्या पापण्या जुळवून डोळे मिटत एकवार त्या गुलाबाचा सुगंध घेतला. तरूणीच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न स्मित उमटून गेले. मग तिने ते फूल आपल्या लांबसडक रेशमी वेणीमध्ये खोचले. लगबगीनेच ती घरात आली आणि अधीरतेने आरशासमोर उभी राहिली. वेणी हातात घेऊन तिने आपले रूप न्याहाळले. तिचा चेहरा नुकत्याच उमललेल्या फुलासारखा फुलला. ‘या आरशाचीच दृष्ट लागायची बाई!’ असे म्हणून दुसऱ्याच क्षणी ती आरशापासून बाजूला झाली. थोड्या वेळाने आपल्या कल्पनेचेच तिला हसू आले.

            दुसऱ्या दिवशी सकाळी कुठल्याशा हुंदक्यासारख्या आवाजाने ती निद्रेतून जागी झाली. बिछान्यातून उठून तिने सगळीकडे नजर फिरवली, परंतु आवाज नक्की कुठून येतोय हे तिला समजेना. तिने बिछान्याकडे पाहिले. काल केसांत माळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या चोळामोळा होऊन इतस्तत: पसरल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावर खिन्न छटा उमटून गेली.
           पुन्हा! पुन्हा तोच मुसमुसत रडण्याचा आवाज! तिने बावरून प्रश्न केला, “कोण आहे? कोण हुंदके देत आहे?”
आता ती कानात प्राण देऊन ऐकू लागली.
किती निष्ठूर आहेस तू. जरासुद्धा दया नाही तुला!”
त्या स्वरामध्ये कंप होता.
           तरूणीने पाहिले. अस्ताव्यस्त पसरलेल्या पाकळ्यांमधील एक पाकळी बोलत होती,
तुझ्या सौंदर्याला शृंगारण्यासाठी तू आमचा उपयोग करून घेतलास. आम्हाला काय सौंदर्य नव्हते? आम्हीसुद्धा वेलीवर मनमुराद  हसत खेळत वाऱ्याच्या लहरीवर तुम्हाला सुगंधच देत होतो ना! तेवढं पुरेसं नव्हतं तर तू आम्हाला वेलीपासून- आईपासून तोडलंस आणि आता देठापासून अलग केलंस। आम्ही पाकळ्या आनंदाने एकमेकांच्या हातात हात गुंफून देठाची शोभा वाढवत गुलाबाचे मोहक सौंदर्य अस्तित्वरूपात आणत होतो. पण आता आम्ही एकमेकांपासून दुरावलो. कोमेजून गेलो. तू पुरेपूर उपयोग करून घेतलास. आता अवघ्या काहीच क्षणांचे सोबती आम्ही!”
         जणू वृक्षाच्या पानांवर रूसून बसलेल्या वाऱ्यासारखा त्या पाकळीचा आवाज होता.
         तरूणीचे हृदय गहिवरून आले.
         खिडकीतून अचानक मंद हवेची झुळूक आली.तरूणीला वळसा देऊन ती झुळूक त्या पाकळीला हळूवारपणे कुरवाळू लागली.
         इतक्यात जवळच असलेली दूसरी पाकळी बोलू लागली,( पहिल्या पाकळीला उद्देशून)
अगं इतकं काय वाईट वाटून घेतेस. रडण्यासारखं काय आहे? फुलांचा जन्मच दुसऱ्यांसाठी झालेला असतो. स्वतः फुलत दुसऱ्याला सुगंध देणे हेच आपले कर्म ! आपण या तरूणीला काही क्षणांसाठी सुगंध देऊ शकलो. तिचा केशसंभार सजवू शकलो. यातच सुख आहे. आपले सौंदर्य कोमेजून गेले म्हणून काय झालं, आपण निरपेक्षपणे या तरूणीचे सौंदर्य शृंगारले. ही सुंदर गोष्ट नव्हे काय? आपले आयुष्य सत्कर्मी लागले. म्हणूनच म्हणते अशी रडू नकोस.”
          बोलताबोलताच त्या पाकळीने अंग आकसून घेतल्यासारखे तरूणीला वाटले.
          दुसऱ्या पाकळीला प्रत्युत्तर देत पहिली पाकळी म्हणाली,” तू बोलतेस ते खरंय, पण आपण आता जर वेलीवर असतो तर अजून काही दिवस तरी मनसोक्तपणे जगू शकलो असतो. येणारी वाऱ्याची झुळूक आपल्याला गुदगुल्या करून सुगंध चोरून नेत असताना आपण हसतच तिला म्हणालो असतो, “वेडी कुठली!” फांदीवर बसणाऱ्या पाखरांच्या मंजूळ गोड सुरांवरती ताल धरून नाचलो असतो. किती किती छान राहिलो असतो आपण आईच्या कुशीत! देवाला वाहिलेल्या फुलांचेदेखील दुसऱ्या दिवशीनिर्माल्यहोते. ‘निर्माल्यम्हणून कृतज्ञतेने त्या फुलांना नदीमध्ये निरोप देऊन स्वर्गाच्या डवारी पाठविले जाते. आपले तेही नशीब नाही हे आपलं दुर्देव!”
        ती पाकळी निष्प्राण झाली.
        तरूणीचा कंठ भरून आला. तिने सर्व पाकळ्या हळूवारपणे गोळा करून ओंजळीत घेतल्या. प्रेमळपणे त्यांच्यावरून हात फिरवला.
        तिच्या डोळ्यांतून टप टप टिपे गळून पाकळ्यांवर पडू लागली. तिच्या अश्रूंनी पाकळ्यांचे ‘निर्माल्य’ झाले होते.

 

प्रतीक प्र. जाधव